तहव्वूर राणावरुन भाजप, काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू   

नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला अमेरिकेने भारताकडे सोपविल्यानंतर आता सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. केंद्रीय उद्योग आणि पुरवठा मंत्री पीयुष गोयल यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने दहशतवाद्यांना शिक्षा केली नाही. त्यांनी कसाबला बिर्याणी खाण्यास दिली. २६/११ तील हल्लेखोरांच्या सूत्रधाराला शिक्षा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण होत  असल्याचे गोयल म्हणाले.  
 
मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याचे प्रत्यार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन भारताच्या दहशतवादाविरुद्ध कडक धोणाचे प्रतिक आहे, असे भाजपने गुरुवारी म्हटले आहे, तर काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी दहशतवादा-विरुद्ध सौम्य भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. 

प्रत्यार्पणाची प्रक्रिया यूपीएच्या काळातच : चिदंबरम 

याला काँग्रेसकडून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात या प्रकरणी केलेल्या कामाचे हे परिणाम आहेत. मोदी सरकारने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली नाही किंवा त्यांना यामध्ये कोणतेही नवीन यश मिळालेले नाही. त्यांना फक्त यूपीएच्या काळात सुरू झालेल्या परिपक्व, सातत्यपूर्ण आणि धोरणात्मक राजनैतिकतेचा फायदा झाला आहे. 
 
हे प्रत्यार्पण कोणत्याही दिखाव्याचा परिणाम नाही, तर राजनैतिकता, कायदा अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रामाणिकपणे आणि कोणत्याही प्रकारे छाती न ठोकता केले, तर भारत काय साध्य करू शकतो याचा हा पुरावा आहे, असा पलटवार चिदंबरम यांनी केला.
 

Related Articles